आई
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही
नाही म्हणवत नाही
जत्रा पांगते
पालं उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच
जाते ठेवून काही..........
जिवाचं जिवालाच
कळावं असं
जाते देऊन काही
आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा
घर उजळतं तेव्हा
तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की
सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान
पिकं येतात जातात
माती मात्र व्याकुळच.............
तिची कधीच भागत नाही तहान
दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो
खोल खोल
की सापडतेच अंतःकरणातली खाण
याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग
कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही
उरतही नाही!
आई एक नाव असतं
नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं!!
2 comments:
hi kavita amhala 1ovila hoti...
tu kahi badal keles ka kavitemadye?
Chana aahe kavita.
Post a Comment